शोभिवंत माशांचे संगोपन व प्रजनन करणे हा नव्याने उदयास आलेला छंद आहे. ह्या छंदापासून मानसिक समाधान प्राप्तीसोबत रोजगाराच्या संधी ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. रंगीत माशांची वाढती आवड लक्षात घेता जगामध्ये याचा व्यापार दिवसेंदिवस वाढत जात आहे. जागतिक उलाढाल 40 कोटी रुपये असून त्याची वार्षिक वाढ दर हा 8 टक्के आहे. सन 1969 पासून भारत विकसित देशांना वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत शोभिवंत मासे निर्यात करीत आहेत. परंतु, जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा फक्त 0.32 टक्के एवढाच असून त्याचे मूल्य सुमारे 23,530 कोटी रुपये इतके आहे. (FAO 2012). नुकत्याच या व्यापारात उतरलेल्या इतर आशियाई देशांची तुलना करता भारताचे उत्पन्न शुल्लक आहे. जरी भारत हा नुकताच यामध्ये उतरला तरी शोभिवंत रंगीत माशांचा व्यापार वेगाने वाढत आहे.
भारतामध्ये 80 टक्के शोभिवंत मासे हे गोड्या पाण्यातील असून त्यातील बरेचसे मासे विदेशी जातीचे आहेत. त्यामधील 98 टक्के मासे हे पालन करुन व 2 टक्के निसर्गातून पकडले जातात. या विभागाची / व्यापाराची वृद्धी करावयाची असल्यास बंदिस्त शोभिवंत माशांची मत्स्य पैदास व संगोपनास प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. शोभिवंत माशांची बंदिस्त पैदास केल्यास जागतिक बाजारपेठेत ज्या माशांना जास्त मागणी आहे त्याचा आपणास मुबलक प्रमाणात वर्षभर पुरवठा करणे शक्य होईल. जर सामुदायिक पद्धतीने शोभिवंत माशांचे पालन व व्यवस्थापन केल्यास त्याचा फायदा हा त्या समुदायातील व्यक्तींना वैयक्तिकरित्या, प्रत्यक्षपणे होईल. तसेच या प्रणालीचा वापर करुन गोड्या व सागरी पाण्यातील शोभिवंत माशांची निर्यात करुन विदेशी चलन मोठ्या प्रमाणात आत्मसात करु शकतो.
महिला व बेरोजगार तरुणांकरीता शोभिवंत माशांची पैदास व पालन हा एक पर्यायी विश्वसनीय जोडधंदा ठरु शकतो. ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी घरगुती छोटे मत्स्य पैदास व मत्स्य विक्री केंद्र चालविल्यास यामार्फत ग्रामीण/शहरी भागातील महिला स्वत:चा आर्थिक विकास करु शकतात. शोभिवंत मत्स्य व्यवसायाचा एकात्मिक पद्धतीने विकास साधण्याचा दृष्टीकोन शासनाने ठेवला आहे. यामध्ये मत्स्यटाक्या बांधून मत्स्यालय बनविण्यासाठी लागणारे सुटे भाग तयार करणे, जिवंत मत्स्यखाद्य तयार करणे व जलवनस्पतींची यांचे पालन व वृद्धी इ. चा समावेश आहे.
राष्ट्रीय मत्स्यिकी विकास बोर्ड, हैद्राबाद यांनी लहान प्रमाणात व एकात्मिक पद्धतीने शोभिवंत मत्स्य प्रजनन व पालन करण्याकरीता लाभार्थींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदान देण्याच्या योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या/व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतील.
स्थळ : -निलक्रांती रोजगार प्रशिक्षण व कोशल्यवृद्धी केंद्र,कोळंब,मालवण
दिनांक : ७ – ९ मे २०१८ , सकाळी ११ ते १
संपर्क : मत्स्य कार्यालय,मालवण (०२३६५/२५२००७)
रविकिरण चिंतामणी तोरसकर,निलक्रांती प्रतिष्ठान(९२२५९००३०३/९४२२६३३५१८)